रात्री टेरेसवर गेला, सकाळी मृतावस्थेत आढळला; हळवलच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

कणकवली : घराच्या टेरेसवरून पडून हळवल-मधलीवाडी येथील २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सूरज अविनाश राणे असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी रात्री घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे हळवल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज राणे हा आपल्या आई-वडील आणि भाऊ प्रथमेश यांच्यासोबत हळवल-मधलीवाडी येथे राहत होता. काही कामानिमित्त त्याचे आई-वडील मुंबईला गेले असल्याने घरी सूरज आणि त्याचा भाऊ असे दोघेच होते. गुरुवारी रात्री त्यांचे चुलत भाऊ सचिन राणे हे देखील त्यांच्या घरी झोपण्यासाठी आले होते.

रात्री जेवणानंतर सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास सचिन आणि प्रथमेश झोपी गेले. दरम्यान, सूरज कोणाला तरी फोन करण्यासाठी घराच्या टेरेसवर गेला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी सचिन यांना सूरज घरात दिसून आला नाही. त्यांनी सूरजच्या मोबाईलवर फोन केला असता, मोबाईल घराबाहेर वाजत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता सूरज गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी सूरजला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. सूरज नेमका टेरेसवरून कसा पडला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

दरम्यान, सूरज हा उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखला जात होता. हुबेहूब रांगोळ्या साकारण्याची त्याला विशेष आवड होती. सध्या तो बोर्डवे येथे पोस्ट खात्यात कार्यरत होता. यापूर्वी त्याने हळवल ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणूनही काम पाहिले होते.

त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका आणि काकी असा परिवार आहे. हळवल गाव तंटामुक्त समितीचे माजी सदस्य अविनाश राणे यांचा सूरज हा मुलगा होता. त्याच्यावर हळवल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका उमद्या आणि कलागुणसंपन्न तरुणाच्या अकाली निधनाने हळवल गावावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.