
📍 भांडुप, मुंबई : मुंबईतील भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या भांडुप कोकण महोत्सवाला आमदार निलेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावत कोकणी बांधवांशी संवाद साधला. शिवसेना भांडुप विधानसभा मतदारसंघाचे सचिव श्री. सुजय धुरत आणि सौ. सुप्रिया धुरत यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या २९ वर्षांपासून सुजय धुरत यांनी कोकणची संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृती मुंबईत जिवंत ठेवण्याचे काम सातत्याने केले आहे. कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच कोकणी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार निलेश राणे यांनी सुजय धुरत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणची ओळख आणि परंपरा जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा महोत्सवांमुळे मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणी बांधवांना आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडले जाण्याची संधी मिळते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित कोकणी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना आणि विचार जाणून घेतले.
या कार्यक्रमाला माजी आमदार श्री. श्याम सावंत, श्री. सुभाष बने, नगरसेवक श्री. माने, श्री. पराग बने यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोकणी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकंदरीत, २९ वर्षांची परंपरा जपणारा भांडुप कोकण महोत्सव म्हणजे मुंबईत कोकणची संस्कृती, खाद्यवैभव आणि कलाविश्वाचा संगम ठरला.












