देवगड : भारतीय संविधान दिनानिमित्त पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेमध्ये संविधानाचे असलेले अनन्यसाधारण स्थान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय संविधानाने देशाला दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये केवळ संविधानापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
संविधानातील तत्त्वांचा आदर राखत लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती देवगडचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या विचारांचा जागर करत आणि लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.










