सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधान दिनानिमित्त संविधानाचा जागर करण्यात आला. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच संविधानातील मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाला आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभली. यावेळी किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याची शपथ घेण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही संविधान दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अकरा किल्ल्यांवर एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऐतिहासिक गड-किल्ले ही केवळ वास्तू नसून आपल्या पराक्रमाची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहेत. त्यामुळे या वारशाचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार गणेश लवे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, दत्ता सामंत, संजू परब, बाबा परब, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, समाजकल्याण अधिकारी तुषार गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘गडांचा मान राखूया, संविधानाचा सन्मान करूया आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जपूया!’ असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.












