मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती देत बाबांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्वी शरद पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते घरी परतले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. बाबांना बहुधा डिहायड्रेशन झाले असावे. त्यांनी आता कामाचा वेग कमी करायला हवा आणि प्रवासही मर्यादित ठेवायला हवा. मात्र, त्यांना त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम असल्याने ते कोणाचेही ऐकत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. पवार साहेबांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत. त्यामुळे कोणीही त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करू नये, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
यापूर्वीही दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान हवामानातील बदलामुळे शरद पवार यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.












