कणकवली : भारतीय संविधान दिनानिमित्त कलमठ सिद्धार्थ कॉलनी येथील संविधान स्तूपाला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधानाचे सामूहिक वाचन करत कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कलमठ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या संविधान स्तूपस्थळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना सरपंच संदीप मेस्त्री यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली आहे. आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात संविधान स्तूप उभारता आला, याचा कायम अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सिद्धार्थ कॉलनीचे चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, माधवी कदम, रोहन कदम, घरकुल लाभार्थी सुनीता पाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र कदम, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, अण्णा सावंत आणि शैलेश कदम उपस्थित होते.
संविधानाचे महत्त्व, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देत कलमठमध्ये संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.












