संजय पेटकर / कोकणशाही कणकवली :
विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आपल्या प्रश्नांना अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत चर्चा करून प्रश्नांचे लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपोषणाला बसण्याचा इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.
SIR प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, राज्याचे महसूल मंत्री, यांच्याकडे आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. यासंदर्भात सुमारे चार वेळा पत्रे देऊनही ठोस उत्तर न मिळाल्याने हा प्रश्न अधिक तीव्र करण्यात आला आहे.
या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा आणि जनतेचा पैसा खर्च होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत तसेच शिक्षक आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे SIR ची नेमकी कार्यपद्धती काय, नियम कोणते आणि कोणत्या निकषांनुसार मतदारांची नोंदणी केली जाणार, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः वास्तव्याचा दाखला म्हणून कोणते कागदपत्र ग्राह्य धरले जाणार, याबाबत लेखी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच SIRच्या अंमलबजावणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना, संबंधित अभिलेख-कागदपत्रे आणि मतदार यादीबाबतची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदार नोंदणी प्रक्रियेत बोगस, दुबार किंवा अपात्र मतदारांची नोंद होऊ नये, तसेच केवळ मतदानाच्या उद्देशाने अन्य ठिकाणाहून आणलेल्या व्यक्तींची नोंदणी होऊ नये, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. भाडेकरूंच्या नोंदणीसह मतदार यादीतील संभाव्य गैरप्रकारांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. बोगस मतदार नोंदणी करणे कायद्यानुसार गुन्हा असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
SIR अंतर्गत मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामध्ये दावे-हरकतींसाठीही कालावधी निश्चित करण्यात आला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने मतदार यादी अचूक आणि पारदर्शक असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संदेश पारकर यांनी म्हटले आहे.
या प्रश्नाबाबत स्स्थनिक पातळीवर प्रशासनाकडून अपेक्षित संवाद आणि लेखी स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही. SIR प्रक्रियेत कोणताही बोगस किंवा दुबार मतदार समाविष्ट होऊ नये, यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरूच ठेवणार,” असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
दरम्यान, 13 ऑगस्टपर्यंत प्रशासनाने या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन लेखी स्पष्टीकरण दिले नाही, तर ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कणकवली प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे











