ओरोस : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शासनाने हाती घेतलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला आणखी ९१ उमेदवारांची निवड यादी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक ताफ्यात आणखी ९१ शिक्षकांची भर पडणार असून, संबंधित उमेदवारांची लवकरच कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षक पदांच्या ८० टक्के पदांची भरती प्रक्रिया शासनाने हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १,३२३ शाळांमधील रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण विभागाने २८२ उपशिक्षक पदांची मागणी शासनाकडे केली होती.
भरतीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १८८ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. यापैकी कागदपत्र पडताळणीच्या वेळी १९ उमेदवार गैरहजर राहिले, तर प्रत्यक्ष समुपदेशन प्रक्रियेत आणखी पाच उमेदवार अनुपस्थित होते. त्यामुळे एकूण १६४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.
आता पवित्र पोर्टल भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवड यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असून, त्यामध्ये आणखी ९१ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास आणखी गती मिळणार आहे.












