महाराष्ट्र भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाची नवी नियुक्ती; कोकण विभागाच्या सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर


सिंधुदुर्ग : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या संयोजक आणि सहसंयोजक पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे प्रभारी कैलास वर्मा यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
या नियुक्त्यांमध्ये कोकण विभागाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी सिंधुदुर्गचे निलेश तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे हा कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, मागण्या आणि सुविधांबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी या प्रकोष्ठाच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यामुळे सिंधुदुर्गातील निलेश तेंडुलकर यांची कोकण विभागाच्या सहसंयोजकपदी झालेली नियुक्ती स्थानिक पातळीवर महत्त्वाची मानली जात आहे.
रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे, प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे तसेच आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करणे, यासाठी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ कार्यरत असते.
दरम्यान, या नियुक्तीची माहिती भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख गोविंद वेतेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.
निलेश तेंडुलकर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.












