पिंगुळी-पाट मार्गावर ओव्हरटेकचा प्रयत्न बेतला अपघातात; कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली!

कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून अपघात झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयाजवळ घडलेल्या या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून परुळेच्या दिशेने जाणारी कार माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयाजवळ आली असता चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या गटारात घुसली. त्यानंतर एसटी बसथांब्याच्या भिंतीला जोरदार धडक देत कार उलटली.

अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत जेसीबीच्या सहाय्याने उलटलेली कार पुन्हा सरळ केली.

या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, या घटनेमुळे पिंगुळी-पाट मार्गावरील वाहनचालकांनी ओव्हरटेक करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.