संविधान केवळ पुस्तकात नको, दैनंदिन जीवनात हवे! नितीन वाळके यांचे प्रतिपादन; गुड मॉर्निंग संघाचा सलग दहाव्या वर्षी शपथ सोहळा

मालवण येथील बोर्डिंग मैदानावर भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुड मॉर्निंग संघाच्या वतीने सलग दहाव्या वर्षी संविधान शपथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे स्मरण करत संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.

भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा अधिकार देणारे सर्वोच्च मार्गदर्शक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू नितीन वाळके यांनी यावेळी केले.

भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये याबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, गुड मॉर्निंग संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गुड मॉर्निंग संघ हा केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार म्हणूनही ओळखला जातो. क्रीडेसोबतच सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीव जपणारे विविध उपक्रम संघाच्या माध्यमातून राबविले जातात.

संविधान दिनानिमित्त आयोजित या शपथ सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा जागर करण्यात आला. संविधानाचा सन्मान राखण्यासोबतच प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्ये आपल्या आचरणातून जपावीत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.