दुर्गावाडी : फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाडी आयोजित दुर्गावाड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नेरूर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना रुपेश पावसकर यांनी आयोजकांचे कौतुक करत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच, “मी नेहमीच या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेईन. निवडणुकीच्या काळात तुम्ही मला दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. तुम्ही कधीही हाक द्या, मी तुमच्या हाकेला हजर असेन,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या मंडळाने अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात करून आज भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत जिल्हाभरात आपला नावलौकिक निर्माण केला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये रोख व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये रोख व आकर्षक चषक असे भरघोस पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट विकेटकीपर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी फ्रीज, मिक्सर, सायकल व आकर्षक चषक अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते गोटू नाईक, फिरोज खतीब, हजीम मुजावर, नफिस शेख, बदर मुजावर, बशीर मुजावर, जोईल नाईक, तब्रेस खान, समीर मुजावर, करीम शाह, जहीर खान, आदीम शाह, फय्याज खान, बाबा शहा यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे दुर्गावाडी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.












