सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उद्या, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी शिक्षण विभागातील प्रलंबित प्रशासकीय प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या दौऱ्यानिमित्त उद्या सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी यांच्या दालनात संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. शिक्षक बदली मान्यता, संच मान्यता यांसह विविध प्रशासकीय प्रकरणे गेल्या वर्षभरापासून निकाली न निघाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुढाकार घेत ही संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत शिक्षणाधिकारी आणि विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा करून प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे चार दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असून, या दौऱ्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न आणि अडचणी मांडाव्यात, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिवांनी केले आहे.
आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या या दौऱ्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे किती प्रलंबित प्रश्न मार्गी लागतात, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.










