पणदूरच्या डॉ. अरुण गोडकर यांना राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव’ पुरस्कार

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अरुण गोडकर यांना कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

डॉ. अरुण गोडकर हे आपल्या वैद्यकीय सेवेतून रुग्णांप्रती संवेदनशीलता आणि माणुसकीचा आदर्श जपणारे डॉक्टर म्हणून परिचित आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना त्यांनी सेवाभावाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे पणदूरसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा मानला जात आहे.

या पुरस्कार सोहळ्याला गडहिंग्लज येथील साधना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बारदेशकर सर, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे सर, अविष्कार फाऊंडेशन इंडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, सौ. प्रतिमा पवार, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते सर, श्री. झीलु गोसावी- अविष्कार फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अरुण गोडकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल पणदूर परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.