राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक!


राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजनांचा आढावा घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत अपुऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत कशी उपलब्ध करून देता येईल, यावर चर्चा करण्यात आली. तसेच राज्य शासनाकडून आतापर्यंत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाच्या उपाययोजनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या बैठकीतील आढाव्यानंतर शेतकऱ्यांसाठी कोणते मदतीचे निर्णय घेतले जातात, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.












