सकाळच्या फेरफटक्यात अचानक बिबट्या समोर! बेबीवाडीत भीतीचे वातावरण

सावंतवाडी : माडखोल-धवडकी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, बेबीवाडी येथे मंगळवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दीपक देसाई यांना रस्त्यालगत काही अंतरावर बिबट्या दिसून आला. अचानक समोर आलेल्या बिबट्याचे प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात छायाचित्र टिपले.

या घटनेमुळे बेबीवाडी तसेच माडखोल-धवडकी परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांना सकाळी फिरायला जाणे, तसेच गुरे चरण्यासाठी जंगल परिसरात घेऊन जाणेही धोकादायक ठरत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धवडकी येथील वनश्री परिसरात चरावयास असलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र, वासराने प्रसंगावधान राखत चपळाईने स्वतःची सुटका करून घेतल्याने अनर्थ टळला.

विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळोवेळी बिबट्याच्या डरकाळ्याही ऐकू येत असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आता वनविभाग या घटनेकडे किती गांभीर्याने लक्ष देतो आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलतो, याकडे माडखोल-धवडकी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.