कोकण रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई! सात महिन्यांत २.६२ लाख प्रवासी जाळ्यात; १७.३१ कोटींची दंडवसुली

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २ लाख ६२ हजार ९३७ विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईतून रेल्वे प्रशासनाने भाडे आणि दंडापोटी तब्बल १७ कोटी ३१ लाख रुपयांची वसुली केली आहे.

या सात महिन्यांत कोकण रेल्वेने एकूण ६ हजार ३१६ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. ऑक्टोबर महिन्यातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. या महिन्यात नियमित तपासणीसह ८९० विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. त्यामध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची २९ हजार ५३६ प्रकरणे समोर आली. संबंधित प्रवाशांकडून २ कोटी १५ लाख रुपयांचा दंड आणि भाडे वसूल करण्यात आले.

दरम्यान, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात मध्य रेल्वेनेही विनातिकीट प्रवासाविरोधात विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २ लाख २७ हजार प्रकरणे उघडकीस आणत २४ कोटी ७४ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली. सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २५० हून अधिक विशेष रेल्वे सेवाही चालवल्या. या सेवांचा ५६ लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला.

आता नाताळच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयातून संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर तपासणी केली जाणार आहे.

त्यामुळे आगामी सुट्टीच्या हंगामात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाची करडी नजर असणार आहे. प्रवाशांनी गैरसोय आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवासापूर्वी वैध रेल्वे तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.