
सिंधुदुर्ग : माणगाव येथील खारफुटी अर्थात मँग्रोव्ह वनक्षेत्रातील जमिनीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जमिनीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. खारफुटी वनक्षेत्रातील जमिनीचा प्रश्न सातत्याने आणि ठामपणे शासनदरबारी मांडत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रत्येक संघर्षात खंबीरपणे साथ देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
खारफुटी वनक्षेत्रातील जमिनीबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रश्नावर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तहसीलदार सचिन पाटील, आनंद शिरवळकर, जिल्हा परिषद सदस्य नागेश आयर, नगरपंचायत अध्यक्ष मिलिंद नाईक, काका कुडाळकर, अरविंद कारलेकर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एकूणच, माणगावच्या खारफुटी जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता शासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.












