सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ; ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट!

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारीसह आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाल्याला योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच स्थानिक शेतीमालासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोव्यातील फोंडा येथील गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्थेला भेट देत अभ्यास दौरा केला.

या दौऱ्यात गोवा बागायतदार संस्थेची खरेदी-विक्री, शेतीमालाची प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन व्यवस्था यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच संस्थेच्या अॅग्रो प्रोसेसिंग युनिटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली.

गोवा बागायतदार संस्थेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकत्र आणून तालुकास्तरावर खरेदी केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा निर्माण करून शेतकऱ्यांचा शेतीमाल एकत्रितपणे बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

विशेष म्हणजे, येत्या हंगामापासून जिल्ह्यात किमान ५ हजार मेट्रिक टन काजू बी खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काजू आणि सुपारीची दर्जानुसार प्रतवारी करून त्यांना योग्य दर देण्याचे नियोजन आहे. सुपारीसाठीही स्वतंत्र खरेदी धोरण तयार करण्यात येणार आहे.

केवळ शेतीमालाची खरेदी-विक्री न करता स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग, पॅकिंग आणि ब्रँडिंगला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांची स्वतंत्र बाजारपेठ विकसित करून विक्रीतून मिळणारा नफा आणि लाभांश थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, काजू प्रक्रिया उद्योजक, तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

एकूणच, सिंधुदुर्गच्या काजू आणि सुपारीसह अन्य शेतीमालाला गोव्याची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नामुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर, विक्रीची हमी आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. आता या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती फायदा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.