मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सन २०२९ पर्यंत बंदरे विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा क्षेत्रनिहाय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी यासंदर्भात आज MMBच्या मुंबई येथील कार्यालयात बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांचा आणि नियोजित उपक्रमांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
राज्यातील बंदरे क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने बंदरे विभागाशी संबंधित आयटीआय कौशल्य विकास अभ्यासक्रम तसेच पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा अशा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या मोठ्या संधी लक्षात घेता, उद्योगांच्या भविष्यातील गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या माध्यमातून स्थानिक तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.












