बिबट्याची विहिरीतून बाहेर पडण्यासाठी दीड तास धडपड! वनविभागाच्या विलंबामुळे अखेर दुर्दैवी मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडेली-खुटवळवाडी येथे वन्यजीवांच्या बचावकार्याबाबत वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. भरवस्तीत असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, तब्बल दीड तास हा बिबट्या विहिरीतून बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत होता. मात्र, वेळेत आवश्यक बचाव यंत्रणा उपलब्ध न झाल्याने अखेर त्याला आपला जीव गमवावा लागला.

सोमवारी रात्री सुमारे ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. आडेली-खुटवळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गडेकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ झाडावर कोंबड्या बसल्या होत्या. त्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्याने झडप मारली आणि तो थेट विहिरीत पडला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मठ वनविभागाचे तीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक बचाव साहित्य आणि यंत्रणा उपलब्ध नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.

दरम्यान, विहिरीतील पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठी बिबट्या सातत्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला बाहेर येण्यासाठी कोणताही आधार मिळत नव्हता. रात्री सुमारे १ वाजून १५ मिनिटांनी वनविभागाची दुसरी टीम पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर या बिबट्याचा मृत्यू झाला.

यानंतर मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाच्या मदतीने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर वनविभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाकडे आवश्यक बचाव साहित्य आणि तातडीची यंत्रणा उपलब्ध असती, तर या बिबट्याचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गडेकर आणि मठ येथील सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक यांनी केला आहे.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर, तात्या कोंडसकर, तेजस शेणई, काकू नाईक, माजी सरपंच सुनील गडेकर, संदेश सुकळवाडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

एकीकडे वन्यजीव संरक्षणासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक बचाव यंत्रणा वेळेत उपलब्ध होत नसेल, तर अशा घटनांना जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.