दोडामार्ग : दिवाळीच्या उत्साहात आनंदासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा सेवाभावी संदेश आदर्शगाव केर येथे पाहायला मिळाला. डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगळवारी गावात मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल हेल्थ केअर व्हॅनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दैनंदिन धावपळीत अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिरामुळे ग्रामस्थांना विविध आरोग्य तपासण्या करून घेण्याची संधी मिळाली. गावातच आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वेळेवर आरोग्य तपासणी करणे आणि आजारांबाबत वेळीच जागरूक राहणे किती महत्त्वाचे आहे, याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शही या उपक्रमाने घालून दिला.
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. गावात ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक विकास कुलकर्णी यांचे आभार मानले.
दिवाळीच्या रोषणाईसोबतच आरोग्य जागृतीचा प्रकाश पसरविणाऱ्या या उपक्रमामुळे केर गावात खऱ्या अर्थाने आरोग्याची ‘दीपावली’ साजरी झाली!












