मुरुड जंजिरा गडाला प्रथम क्रमांक; राजगड द्वितीय तर हरिहर गडाने पटकावला तृतीय क्रमांक.



कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची, गड-किल्ल्यांच्या वैभवशाली परंपरेची आणि दुर्गसंवर्धनाच्या महत्त्वाची जाणीव नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले स्पर्धा २०२६ ला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत स्पर्धकांनी आपले कलागुण, कल्पकता आणि ऐतिहासिक वारशाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मुरुड जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी शिवम शिंदे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक हरिहर गडाच्या प्रतिकृतीसाठी केळबाई मित्रमंडळाने पटकावला.
या स्पर्धेत रायगड किल्ल्याची प्रतिकृती अमित कारेकर, सिंहगड श्लोक वेदक, प्रतापगड गोविंद घाडी, विजयदुर्ग घाडीवाडी मित्रमंडळ, मुरुड जंजिरा महेश ओटवणेकर, विजयदुर्ग विधी जळवी आणि राजगड निनाद नाईक यांनी साकारून शहरातील एकूण दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या परीक्षणावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांनी भेट देऊन स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण संदीप चिऊलकर आणि साळसकर यांनी केले. त्यांनी प्रत्येक गडाच्या प्रतिकृतीची रचना, मांडणी, कलात्मकता आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये यांचा विचार करून परीक्षण केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, शिवसेना शाखाप्रमुख योगेश काळप, प्रथमेश कांबळी, निलेश उर्फ बंड्या शिरसाट, राजाराम गडेकर आणि संदेश सावंत यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांविषयी अभिमान निर्माण करण्याचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना स्पर्धकांनी दाखविलेली मेहनत, कल्पकता आणि उत्साह कौतुकास्पद ठरला.
इतिहासाची ओळख, स्वराज्याचा अभिमान आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा कुडाळ शहरात विशेष आकर्षण ठरली.












