एका फोन कॉलने मुंबईत खळबळ! CSMT स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; तीन तास तपासणी

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळी आलेल्या एका धमकीच्या फोनमुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट झाल्या. त्यानंतर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सीएसएमटी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देत स्फोटाची धमकी दिली.

प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकाला लक्ष्य करण्याची धमकी मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. घटनास्थळी पोलीस पथकांसह श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाला पाचारण करण्यात आले. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर, फलाट आणि संशयित ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली.

सुमारे तीन तास ही शोधमोहीम सुरू होती. अखेर रात्री ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास तपासणी मोहीम थांबवण्यात आली. मात्र, या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही.

दरम्यान, ज्या मोबाइल क्रमांकावरून धमकीचा फोन करण्यात आला, त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हा धमकीचा फोन कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

एकीकडे सीएसएमटीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाला मिळालेल्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या, तर दुसरीकडे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणाऱ्या अशा धमक्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.