कणकवली : केंद्र सरकारमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कणकवलीतील संशयित महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे. विनिता विवेक मुंज (वय ५०, रा. पटकीदेवी, कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर शुक्रवारी ती स्वतःहून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाली.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून प्रत्येकी २४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुनील दामोदर धुरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
फिर्यादी यांच्या पत्नी आरोग्य विभागात कार्यरत असून, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या विनिता मुंज हिने केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी ओळखी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सिद्धेश व माधुरी धुरे यांच्यासह अन्य काही जणांकडून प्रत्येकी २४ लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम विनिता मुंज हिच्यामार्फत सुबत्ता माळी यांच्याकडे देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात विनिता मुंज, सुबत्ता माळी, मनोजकुमार जैन, भागवत यादव, उमेश घोष, जनकराम यादव आणि नीरज श्रीवास्तव अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनिता मुंज हिने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर तिने पोलिसांसमोर हजेरी लावली. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.
केंद्र सरकारच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील इतर आरोपींच्या अटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












