मंत्र-तंत्राने पैसे दुप्पट करण्याचे आमिष; महिलेची २२ लाखांची फसवणूक! कोल्हापुरातून संशयित महिलेला अटक

फोंडा : मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयित महिलेला फोंडा पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. दुर्गामाता ऊर्फ रूपाली सुनील पवार (वय ४६, मूळ रा. कर्जत, रायगड, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात संशयित रूपाली पवार हिने कुर्टी-फोंडा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरी भेट दिली होती. यावेळी तिने विशिष्ट मंत्र आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून रोख रक्कम दुप्पट करून देण्याचा दावा केला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने तब्बल २२ लाख रुपयांची रोख रक्कम तिच्याकडे सुपूर्द केली.

मात्र, पैसे हातात पडताच संशयित महिलेने संपूर्ण रक्कम घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने फोंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत फोंडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक राजशेखर रेड्डी यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित महिलेचा माग काढला. ती कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन तिला अटक केली.

मंत्र-तंत्र आणि पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडल्याने २२ लाख रुपये गमावण्याची वेळ या महिलेवर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या फसव्या आमिषांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.