आगीचा भडका! कसबा बावड्यात भरचौकात मोटारसायकल जळून खाक; नागरिकांची मोठी गर्दी!

कोल्हापूर : शहरातील कसबा बावडा परिसरातील शिवछत्रपती पुतळ्याच्या चौकात उभी केलेली मोटारसायकल अचानक पेटल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकात पार्क केलेल्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. मोटारसायकलमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल असल्याचे मालकाने सांगितले. त्यामुळे आगीचा भडका अधिकच वाढला. स्वतःच्या डोळ्यांसमोर दुचाकी जळताना पाहून मालकही हतबल झाला होता.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मात्र, आगीची तीव्रता पाहता ती विझवण्यासाठी पुढे येण्याचे धाडस कोणी केले नाही. काही नागरिक मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण करण्यात व्यस्त असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी मोटारसायकल उभी होती, त्या दुकानांच्या पाठीमागे रहिवासी घरे आहेत. आगीच्या भीषणतेमुळे घरातील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक घाबरून घराबाहेर आले. त्यामुळे आग आसपासच्या घरांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बराच वेळ उलटला होता. अखेर या आगीत मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षित पार्किंगचा आणि आग लागल्यास तातडीने मदत करण्याच्या नागरिकांच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.