सावंतवाडी : साहित्य आणि कला क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ओटवणेचे सुपुत्र संतोष चिले यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आणि प्रियदर्शिनी फाऊंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, येत्या १५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
संतोष चिले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेत आतापर्यंत १२ प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा ‘मुक्या वेदना’ हा स्वतंत्र काव्यसंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सभासद तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये आयोजित विविध काव्यसंमेलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
केवळ साहित्यनिर्मितीपुरते मर्यादित न राहता व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाचे महत्त्व अशा विविध सामाजिक विषयांवर आपल्या प्रभावी कवितांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
आपल्या प्रदीर्घ साहित्य साधनेतून आणि कला प्रवासातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संतोष चिले यांच्या या सन्मानामुळे ओटवणे गावासह सावंतवाडी परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. प्रियदर्शिनी फाऊंडेशन, सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साहित्यसेवेचा सन्मान आणि कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! संतोष चिले यांचे या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!












