देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरुन दगड कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदेसेना आणि उद्धवसेनेने केली आहे. याविषयी शनिवार, १४ रोजी देवरुखचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांना निवेदन देण्यात आले. यात गतवर्षापासून देण्यात आलेल्या निवेदनांचा संदर्भही देण्यात आला आहे. यावेळी उद्धवसेना तालुकाप्रमुख नंदादीप उर्फ बंड्या बोरुकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद सावंत, शिंदेसेना उपतालुकाप्रमुख सचिन मांगले, माजी उपसभापती अजित उर्फ छोट्या गावणकर, नगरसेवक चंद्रकांत कामेरकर, नगरसेविका निदा कापडी, बाळा माने, राजू सावंत, सामाजिक कार्यकर्ते निखिल कोळवणकर, आकाश भोपळे यांच्यासह शंभरहून अधिक ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. दत्त मंदिराकडे जाणाऱ्या फूटब्रिजचे काम सध्या सुरू असून, या कामासाठी मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर नदीपात्रात ५० ते ६० सुरुंग स्फोट करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या स्फोटांमुळे डोंगरावरील दगड सैल होऊन दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी ग्रामस्थांनी देवरुख पोलिसांना निवेदन देऊन धोक्याची पूर्वकल्पना दिली होती. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवादरम्यान गुहेतील दगड कोसळून काही भाविक महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर ३० एप्रिल रोजी पुजारी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन संभाव्य जीवितहानीबाबत चिंता व्यक्त केली होती. वारंवार सूचना देऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी दिलेल्या निवेदनांची वेळीच दखल घेतली असती, तर शुक्रवारी घडलेली दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.












