पाली : थंडीची चाहूल लागताच निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात देशी आणि विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशांतून येणाऱ्या या रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, खाड्या, पाणथळ जागा, जंगल परिसर आणि भातशेते पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जात आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक, अभ्यासक, छायाचित्रकार आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नव्हते. मात्र, आता वातावरणात गारवा वाढू लागला असून थंडीचे आगमन होताच या पक्ष्यांनी रायगड जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
या हंगामात ब्ल्यू थ्रोट, युरोपियन रोलर, युरेशियन रायनेक, सायबेरियन स्टोनचॅट, बंटिंग्स आणि पॅलिड हॅरिअर यांसारख्या विदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. तर स्वर्गीय नर्तक, भारतीय तास पक्षी, खाटीक, हुदहुद आणि क्रेस्टेड बंटिंग यांसारख्या स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचीही रेलचेल पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, हे पक्षी केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. गवताळ प्रदेशातील कीटक आणि अळ्या, जलाशयांमधील कृमी व जलचर जीव, तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील छोटे खेकडे आणि मासे हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत होते.
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ४०० हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. समुद्रकिनारे, खाड्या, दलदलीचे प्रदेश, घनदाट जंगले, माळराने आणि भातशेती अशा विविध नैसर्गिक अधिवासांमुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी रायगड जिल्हा महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.
याबाबत पक्षी व वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनेक प्रकारचे नैसर्गिक अधिवास उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या संख्येने विविध पक्षी येथे दाखल होतात. पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा काळ विशेष पर्वणीचा असतो.
दरम्यान, उत्तर गोलार्धातील युरोप, रशिया आणि उत्तर अमेरिकेसारख्या प्रदेशांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत खाद्य आणि अनुकूल हवामानाच्या शोधात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतासह विविध उष्ण प्रदेशांमध्ये दाखल होतात. येथे मुबलक खाद्य आणि पोषक अधिवास मिळत असल्याने त्यांना प्रजनन आणि पिल्लांचे संगोपन करण्यासाठीही अनुकूल परिस्थिती मिळते.
एकूणच, रायगड जिल्ह्यात सुरू झालेली स्थलांतरित पक्ष्यांची ही हजेरी निसर्गप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. मात्र, या पाहुण्या पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, पाणथळ जागांचे संवर्धन करणे आणि पक्ष्यांना त्रास होईल अशा कृती टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
रायगडच्या निसर्गसौंदर्यात भर घालणाऱ्या या परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील जैवविविधतेला नवी झळाळी मिळत आहे.












