सावंतवाडीत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा; सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि स्पर्धांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित!

सावंतवाडी : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. तसेच बालदिनाचे महत्त्व विशद करून बालकांचे समाजातील स्थान आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या विशेष दिनानिमित्त शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर माध्यमिक विभागातील शिक्षकांनी समूहगानातून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी शाळेच्या परिसरात विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्टॉल्सचा मनसोक्त आनंद लुटला. तर दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन केले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ आणि स्पर्धांमुळे शाळेचा संपूर्ण परिसर आनंदाने आणि उत्साहाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा बालदिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा तुळसकर यांनी केले, तर दीपिका कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांची रंगत यामुळे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील बालदिनाचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.