सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशीत सध्या भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाहनधारक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मळेवाड, साटेली, सातार्डा आणि परिसरातील गावांमध्ये उभ्या असलेल्या डंपर, कॅन्टर यांसारख्या वाहनांच्या महागड्या बॅटऱ्या तसेच शेतातील पाण्याचे पंप चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहेत. ऐनवेळी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याने वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर शेतपंप चोरीमुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे.
विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी उभी असलेली वाहने आणि शेतातील साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आता ग्रामस्थांसमोर उभे राहिले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून संबंधित चोरट्यांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी मळेवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.
आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत वाहनधारक आणि शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.












