सिंधुदुर्ग : रत्नागिरीहून सावंतवाडीकडे येताना मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली जवळ नांदगाव ओटव फाटा येथे कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातातसिंधुदुर्गातील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९ रा. माठेवाडा सावंतवाडी) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (४६) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज, सोमवारी (दि.१६) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. शरयू आसोलकर यांच्या निधनाची माहिती मिळताच सावंतवाडीत अनेकांनी शोक व्यक्त केला तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकजण घटनास्थळी रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर आणि त्यांचे भाऊ वैभव हे रविवारी रत्नागिरीला गेले होते. ते पुन्हा कारमधून सावंतवाडीकडे येत होते. त्याची कार कणकवली नांदगाव ओटव फाटा परिसरात आली असता कार समोर अचानक एक गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नांदगाव केंद्राच्या तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला.
डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांनी कवयित्री म्हणूनही साहित्यविश्वात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. एका प्रतिभावान कवयित्रीला गमावल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.












