सावंतवाडी : भारतीय सैन्यदलाच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपणाऱ्या १७ मराठा रुईवा परिवाराचा ६४ वा ‘रेजिंग डे’ सोहळा सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देशसेवेचा अभिमान, शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण आणि सैनिक परिवारातील एकजुटीचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाला ब्रिगेडियर चव्हाण आणि कर्नल किशोर भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भास्कर राणे यांची विशेष उपस्थिती लाभली. देशाच्या विविध भागांतून आलेले सैन्यदलातील अधिकारी, आजी-माजी सैनिक, सेवेत कार्यरत जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
श्री गणपती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री त्रिंबोली माता देवीचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.
सोहळ्यातील अत्यंत भावनिक क्षण ठरला तो वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सहभागी झालेले शहीद नायक गोविंद गावडे यांच्या पत्नी सत्यवती गावडे, तसेच १९८८ मध्ये श्रीलंकेत शहीद झालेले रामचंद्र गावडे यांच्या पत्नी सीताबाई गावडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग रुईवा परिवाराचे अध्यक्ष शशिकांत गावडे, दशरथ चव्हाण आणि विलास राणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यासोबतच आजी-माजी सैनिक आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या शौर्याचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचा आणि सैनिक परिवाराच्या एकजुटीचा संदेश देणारा हा ६४ वा रेजिंग डे सोहळा सिंधुदुर्गात अभिमान आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.












