सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे आशिष सुभेदार काळाच्या पडद्याआड!

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार (वय ३१) यांचे आज, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गोवा येथील बांबुळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

आशिष सुभेदार यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली होती. सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर विद्यार्थी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, माजी आमदार तथा शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आशिष सुभेदार यांनीही त्यांच्या सोबत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी तालुक्यात संघटनात्मक बांधणी आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून आशिष सुभेदार यांची ओळख होती. सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असत. दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांना किडनीच्या आजाराचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे चुलत बंधू सुजय सुभेदार यांनी दिली.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.

अल्पवयातच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आशिष सुभेदार यांच्या अकाली निधनाने ठाकरे युवा सेनेने एक सक्रिय युवा कार्यकर्ता गमावला असून, सावंतवाडीच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.