रायगडावरून होणार बाल मावळ्यांचा सन्मान! दिवाळीत किल्ले साकारणाऱ्या प्रत्येक बाल मावळ्याला मिळणार सन्मानपत्र!

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या बाल मावळ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

दिवाळीनिमित्त आपल्या परिसरात शिवरायांचे गड-किल्ले साकारणाऱ्या राज्यभरातील बाल मावळ्यांचा आता थेट दुर्गराज रायगडावरून गौरव करण्यात येणार आहे.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल मावळ्याला समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी ही माहिती दिली.

दिवाळीच्या सणात लहान मुले मोठ्या उत्साहाने मातीचे गड-किल्ले साकारतात. या प्रतिकृती केवळ कलाकृती नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गडकोटांचे ऐतिहासिक महत्त्व आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देणारे माध्यम आहे. बाल मावळ्यांच्या याच कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी समितीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बाल मावळ्यांनी त्यांनी साकारलेल्या गड-किल्ल्याचा फोटो किंवा व्हिडिओ म्हणजेच रील सोशल मीडियावर पोस्ट करायची आहे. तसेच समितीच्या अधिकृत @rajyabhishek या Instagram खात्याला Collab करणे आवश्यक आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी २२ नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

याबाबत बोलताना समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी स्पष्ट केले की, हा कोणताही स्पर्धात्मक उपक्रम नसून शिवचरित्राचा प्रसार आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या बाल मावळ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा एक प्रयत्न आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल मावळ्याला सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

दरम्यान, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने गेली ३२ वर्षे किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.

आपल्या गावात, वाडीत किंवा परिसरात दिवाळीनिमित्त लहान मुलांनी गड-किल्ले साकारले असतील, तर पालकांनी त्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

एकंदरीत, मातीच्या गड-किल्ल्यांतून शिवइतिहास जिवंत ठेवणाऱ्या बाल मावळ्यांच्या पाठीवर आता दुर्गराज रायगडाची शाबासकीची थाप पडणार आहे. बालपणात रुजणारा शिवइतिहासाचा हा संस्कार निश्चितच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे!