कामासाठी घराबाहेर पडले, पण परतलेच नाहीत; सावंतवाडीत रिक्षाचालकाचा मृत्यू

सावंतवाडी : शहरातील न्यू सबनीसवाडा परिसरात एका ४२ वर्षीय रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली. दिनेश रामचंद्र मांजरेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मांजरेकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे पत्नीला कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील चिकूच्या झाडाला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

दिनेश मांजरेकर हे गेल्या काही महिन्यांपासून शाळा क्रमांक ४ परिसरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक असा परिवार आहे.

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची खबर त्यांचे पुतणे हितेश मांजरेकर यांनी पोलिसांना दिली असून, सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.