- 🛑शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख अ.जा. तथा संस्थापक अध्यक्ष श्रमिक कामगार संघटना प्राजक्त चव्हाण यांची माहिती.
- 🛑बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत; नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठीही आर्थिक सहाय्य
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत १८ योजनांचे सुलभीकरण केले आहे. यासंदर्भात कामगार विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या १० योजना आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ८ योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे योजनांच्या अर्ज प्रक्रियेत सुलभता आणणे, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, माहितीची पडताळणी डिजिटल पद्धतीने करणे आणि अर्ज मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करणे यावर भर देण्यात आला आहे.
🛑बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्य
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आठ योजनांमध्ये बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. इयत्ता नववी उत्तीर्ण झालेल्या कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना प्रत्येकी २० हजार रुपये, तर इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या दोन पाल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये शैक्षणिक सहाय्य देण्याची योजना आहे. या दोन्ही योजनांसाठी संबंधित इयत्ता उत्तीर्ण झाल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी संबंधित योजनांचा लाभ घेतला असल्यास काही अपात्रतेच्या अटी लागू आहेत.
वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना दरवर्षी १ लाख रुपये, तर अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन पाल्यांना दरवर्षी ६० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. या योजनांसाठी विद्यार्थी संबंधित पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. डिप्लोमा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना या योजनांचा लाभ लागू नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
🛑मृत्यू व अपंगत्वाच्या प्रसंगीही आर्थिक मदत
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला ३ लाख ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. यासाठी कामगाराची किमान तीन वर्षांची नोंदणी आवश्यक असून ती सलग असणे बंधनकारक नाही. मृत्यूच्या दिनांकापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
बांधकामस्थळी अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला ६ लाख ५० हजार रुपये सहाय्य देण्याची तरतूद आहे. नोंदणीचा अर्ज सादर केल्यानंतर अंतिम निर्णय होण्यापूर्वी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यासही पात्रतेची तरतूद नमूद करण्यात आली आहे.
तसेच किमान ७५ टक्के अपंगत्व आलेल्या बांधकाम कामगाराला २ लाख रुपये अपंगत्व सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी अपंगत्व प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना पहिल्या दोन अपत्यांच्या प्रसूतीसाठी नैसर्गिक किंवा सिझेरियन प्रसूती झाल्यास २५ हजार रुपये सहाय्य देण्याची योजना आहे. प्रसूतीनंतर बालकाचा मृत्यू झाल्यासही जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रसूती प्रमाणपत्र सादर केल्यास लाभ मिळण्याची तरतूद आहे.
🛑अर्ज प्रक्रियेसाठी ४५ दिवसांची कालमर्यादा
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या आठ योजनांसाठी अर्ज निकाली काढण्याची निर्धारित कालमर्यादा ९० दिवसांवरून कमी करून ४५ दिवस करण्यात आली आहे. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रथम स्तरावर संबंधित कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करणार असून त्यानंतर नोंदणी अधिकारी अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचा निर्णय घेणार आहे.
🛑डिजिटल अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची पडताळणी
नवीन प्रक्रियेमध्ये कामगार नोंदणी क्रमांक, आधार तपशील, बँक खाते, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. काही माहिती संबंधित डिजिटल प्रणालींमधून आपोआप उपलब्ध करून घेण्याची तरतूद आहे. अर्जदाराला आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, स्वयंघोषणा स्वीकारणे आणि आधार-आधारित OTP पडताळणी करून अर्ज अंतिम सादर करणे अपेक्षित आहे.
या निर्णयामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना योजनांचा लाभ मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालमर्यादेत पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संदर्भ : महाराष्ट्र शासन, कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.१३६/कामगार-९, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६.












