मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील ४२ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी मालवण येथे घडली. बोट सफरीचा आनंद घेतल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत महिलेचे नाव अनुश्री भावेश गुहागरकर असे असून त्या मुंबईतील कांदिवली येथील चारकोप परिसरातील रहिवासी होत्या. पती भावेश गुहागरकर आणि कुटुंबीयांसह त्या मालवणमध्ये पर्यटनासाठी आल्या होत्या.
बुधवारी चिवला बीच परिसरात जलपर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर बोटीवर असताना अनुश्री यांना अचानक उलटी झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. दरम्यान, पर्यटन व्यावसायिकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल स्थानिकांकडून कौतुक व्यक्त होत असून, या दुर्दैवी घटनेने पर्यटन व्यावसायिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी पती भावेश गुहागरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जे. एन. डिसोझा या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मालवणमध्ये आलेल्या गुहागरकर कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.












