कुडाळ : शेअर मार्केटमध्ये झालेलं मोठं आर्थिक नुकसान, डोक्यावर वाढलेलं कर्ज आणि ते फेडण्यासाठी केलेलं धाडसी कृत्य… या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील एसबीआय बँकेच्या पानबाजार शाखेत ३३ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी भक्तराज वासुदेव सडवेलकर (वय २८, रा. पिंगुळी काळेपाणी) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित भक्तराज याने कुडाळ पानबाजार येथील एसबीआय शाखेत प्रवेश केला. यावेळी त्याने एका महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत पैशांची पिशवी हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता त्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याला बँकेबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत आणले.
मात्र, महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि क्षणात परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र तो रोकड असलेली पिशवी घेऊन पळू लागला. नागरिकांनीही हार न मानता त्याचा सुमारे दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला. अखेर गुलमोहोर हॉटेलजवळ त्याला पकडण्यात यश आले. संतप्त जमावाने त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, या घटनेत लुटण्यात आलेली तब्बल ३३ लाख रुपयांची संपूर्ण रोकड पोलिसांनी सुरक्षितपणे हस्तगत केली आहे. बँक कर्मचारी सोनाली जळवी यांच्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागे शेअर मार्केटमधील मोठे आर्थिक नुकसान आणि त्यातून निर्माण झालेल्या कर्जाचा डोंगर हे कारण असल्याची माहिती समोर येत आहे. कर्ज फेडण्यासाठी तरुणाने थेट बँक लुटण्याचा मार्ग निवडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.
शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्याच्या नादात थेट बँक लुटण्यापर्यंत मजल गेल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.












