कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठी सुविधा! आमदार निलेश राणेंच्या हस्ते वातानुकूलित प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन

कुडाळ : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुडाळ रेल्वे स्थानकावर एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित (एसी) प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या नव्या सुविधेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर वातावरणात थांबता येणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात प्रवाशांना या वातानुकूलित प्रतीक्षा कक्षाचा लाभ मिळणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, काका कुडाळकर, कुडाळ नगर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद नाईक, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, आनंद शिरवळकर यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

कुडाळ रेल्वे स्थानकावर उपलब्ध झालेल्या या सुविधेमुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये भर पडणार असून, स्थानकाच्या प्रवासी सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कुडाळ रेल्वे स्थानकाचा सुविधांच्या बाबतीत होत असलेला हा बदल प्रवाशांसाठी कितपत दिलासादायक ठरणार, हे आगामी काळात पाहायला मिळेल.