

कणकवली | सिंधुदुर्ग
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवासी शेडचे उद्घाटन आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कणकवली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांसाठी शेड उभारण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी बोलताना, खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरीचे मंडल रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, ए.एस.सी. गोकुळ सोनवणे, आरपीएफ कणकवलीचे पीआय राजेश सुरवाडे, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, अमोल रासम आणि सागर राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नव्या प्रवासी शेडमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी भर घालणारे हे पाऊल ठरले आहे.












