कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील जोशीवाडी परिसरात एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.
साक्षी समीर जोशी (वय ४०, रा. जोशीवाडी, पिंगुळी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी जोशी या आज सकाळी कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच सकाळी साडेदहाच्या सुमारास घराशेजारील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
साक्षी जोशी या आजारपणाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मळगावकर आणि महेश भोई करीत आहेत.
पिंगुळीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.












