रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा ठरला जीवघेणा! दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारासह इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

अलिबाग : रस्त्याच्या कामातील गंभीर निष्काळजीपणा एका निष्पाप दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील नागाव-रेवदंडा मार्गावर घडली आहे. रस्त्याच्या मध्यभागी टाकून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५४ वर्षीय प्रकाश काशिनाथ भगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अलिबाग पोलिसांनी संबंधित ठेकेदार, इंजिनियर आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार कंपनीच्या टीम लिडरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागाव येथील खारगल्ली बसथांब्याजवळ आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान खोदकामातून निघालेला मातीचा मोठा ढिगारा थेट रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. मात्र, वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले बॅरिकेड्स, ब्लिंकर लाईट्स किंवा धोक्याचे सूचना फलक लावण्यात आले नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास बोरपाडा येथील प्रकाश भगत हे रेवदंडा येथून नागावच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. यावेळी अंधारामुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेला मातीचा ढिगारा त्यांच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून समोरील खड्ड्यात कोसळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी कामातील निष्काळजीपणाला जबाबदार धरत ठेकेदार जगदिस्वरण राजू, इंजिनियर प्रेमचंद मुरली आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार कंपनीचे टीम लिडर रामकिसन शर्मा यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासकामे करताना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवाने मोजावी लागते, हे या दुर्दैवी घटनेतून समोर आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत.