मालवणच्या सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने विरोधातील याचिका फेटाळल्यानंतरही काही मंडळींकडून या निर्णयाबाबत चुकीचा अर्थ लावून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे.
न्यायालयात आपली बाजू टिकवता आली नाही, तरी जनतेसमोर वेगळेच चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आमदार राणे यांनी संबंधितांवर जोरदार निशाणा साधला. ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. आधी न्यायालयाचा निर्णय समजून घ्या आणि मग जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करा, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मालवणच्या सीआरझेड आणि किनारपट्टीच्या भवितव्याच्या दृष्टीने राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयाचे नेमके महत्त्व काय आहे, तसेच या निर्णयामुळे मालवणच्या किनारपट्टीसाठी कोणत्या सकारात्मक शक्यता निर्माण होऊ शकतात, याची सविस्तर माहिती येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेत न्यायालयीन निर्णयाचे महत्त्व, किनारपट्टीसंदर्भातील वस्तुस्थिती आणि या विषयावरून जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांचा समाचार घेतला जाणार आहे.
न्यायालयाचा निर्णय काहींच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही म्हणून वास्तव बदलत नाही. फेक नरेटिव्ह कितीही पसरवले, तरी सत्य जनतेसमोर आणणारच, असा ठाम संदेश आमदार निलेश राणे यांनी दिला आहे.
आता येत्या दोन दिवसांत होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे कोणते महत्त्वाचे खुलासे करतात आणि विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण मालवणवासीयांचे लक्ष लागले आहे.
कोकणातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा… कोकणशाही!












