पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर सहा जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर गोळीबार करत त्यानंतर कोयत्यानेही हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मंदार किवळे यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी मंदार किवळे यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. मात्र, गोळीबारात नेम चुकल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आरोपींनी दोन पिस्तुलं घटनास्थळी फेकून दुचाकीवरून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृत मंदार किवळे हे एका हत्या प्रकरणातील साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागील नेमके कारण काय, हा हल्ला पूर्वनियोजित होता का आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, या घटनेचा थरारक अनुभव एका वकिलाने सांगितला आहे. प्रत्यक्ष गोळीबाराची घटना आपण पाहिली नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, गोळीबारानंतर संबंधित व्यक्ती ‘बचाव, बचाव’ असे ओरडत रक्तबंबाळ अवस्थेत न्यायालयाच्या गेटबाहेर आली. या घटनेमुळे न्यायालय परिसरातील वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
विशेष म्हणजे, न्याय मिळवण्यासाठी नागरिक ज्या न्यायालयात येतात, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अशा प्रकारे गोळीबार आणि कोयत्याने हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आता या प्रकरणातील आरोपी कधी जेरबंद होणार आणि या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












