रत्नागिरी : बांधकामाच्या उपकंत्राटातील काम पूर्ण करूनही तब्बल ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम न मिळाल्याने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीतील कोस्टगार्ड बांधकाम प्रकल्पात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी नाशिक आणि पुण्यातील चार जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुण्यातील वारजे परिसरातील ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’च्या संचालिका अश्विनी सुनील आंबेकर यांनी २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील ‘मेसर्स प्राड इन्फ्रा’ या कंपनीला रत्नागिरी कोस्टगार्डच्या बांधकामाचा ठेका मिळाला होता. या कंपनीचे मालक दिगंबर पिंगळे यांनी अश्विनी आंबेकर यांच्याशी रीतसर करार करून त्यांना बांधकामाचे उपकंत्राट दिले होते.
१५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोस्टगार्डच्या झाडगाव येथील मॅरीड अकोमोडेशनच्या एस-७ आणि एस-८ इमारतींचे फिनिशिंग वर्क, तसेच मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसच्या ओटीएम गॅरेजचे आर.सी.सी. स्लॅब लेबर वर्क अशी कामे त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
फिर्यादींनी करारानुसार ही सर्व कामे पूर्ण केली. मात्र, कामाचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर तब्बल ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम थकीत राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामध्ये फिनिशिंग कामाचे ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये, तर गॅरेज स्लॅब कामाचे जीएसटीसह २५ लाख ५ हजार ३३१ रुपये असे एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपये देणे बाकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कंपनीचे मालक दिगंबर आनंदराव पिंगळे, प्रकल्प व्यवस्थापक श्रीधर सुरेंद्र लोंढे, प्रकल्प समन्वयक दिनेश नाङगोंडे आणि श्रुती असोसिएट्सचे मालक राजू खेतावत या चौघांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोस्टगार्डसारख्या महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पातील उपकंत्राटाच्या व्यवहारात एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.












