कणकवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या बैठकीला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती दर्शविल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, या बैठकीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट स्पष्टीकरण नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले आहे.
याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता पारकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकासमंत्री असल्याने त्यांनी नगरपालिकांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. शहरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पुन्हा अधिकार मिळवून देणे तसेच नगराध्यक्ष आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधणे, अशा महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी बोलताना संदेश पारकर यांनी सांगितले की, येत्या २१ डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे. यापूर्वीही नगराध्यक्षांच्या प्रशिक्षणासाठी आपण म्हाळगी प्रबोधिनी येथे उपस्थित राहिलो होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीसाठी आपल्याला रीतसर निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे कणकवली शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी आपण या बैठकीला उपस्थित राहिलो होतो.
जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पुन्हा त्यांचे अधिकार मिळावेत, अशी सर्व नगराध्यक्षांची मागणी आहे. याशिवाय नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्यात योग्य समन्वय निर्माण झाल्यास शहरांच्या विकासाला अधिक गती मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांचे विविध प्रश्न जाणून घेतले असून नगराध्यक्षांना पुन्हा अधिकार देण्याबाबत सकारात्मक ग्वाही दिली आहे, असेही पारकर यांनी सांगितले.












