मुंबई : भंडारा जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमधील मत्स्यपालनाला चालना देऊन स्थानिक मच्छीमारांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यातील तलावांमधील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. याच अनुषंगाने तलावांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमधील मत्स्यव्यवसायाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या माध्यमातून मत्स्य उत्पादनात वाढ, मत्स्यपालनासाठी आवश्यक सुविधा आणि स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, भंडारा जिल्हाधिकारी ऑनलाइन माध्यमातून तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकंदरीत, भंडारा जिल्ह्यातील जलसंपत्तीचा योग्य वापर करून मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.












