‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना – २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा – सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन

सिंधुनगरी :
ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक, पशुपालक यांच्यासाठी पशुधन आधारीत व्यवसायाला प्रोत्साहन देणारी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना – २०२६’ जाहीर झाली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक, पशुपालक यांच्यासाठी पशुधन आधारीत व्यवसायाला प्रोत्साहन देणारी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना – २०२६’ जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये संकरित गाय / म्हैस खरेदी, शेळीपालन, कुक्कुटपालन आदीचे प्रकल्प राबविण्यासाठी खर्चाच्या ५०% व अनुसूचित जाती-जमाती करिता ७५% पर्यंतचे अनुदान* राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा शुभारंभ दि. २६ नोव्हेंबर, २०२६ पासून ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू होत असून यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबविली जाणार आहे.

यासाठी अर्जदार यांनी पोर्टलद्वारे अर्ज करावयाचा आहे. अनुदान डीबीटी आधार लिंक बँक खात्यात जमा होणार असून अर्जदार यांनी अर्ज करताना फार्मर आयडी व महा आयडीचा वापर करून अर्ज करावयाचा आहे. सदर अर्जाची निवड शासन धोरणानुसार होणार असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • या योजनेत अर्ज करता येणारे प्रमुख व्यवसाय :
  • दुग्ध व्यवसाय : गाय / म्हैस पालन
  • शेळी-मेंढी पालन : गट प्रकल्प
  • कुक्कुटपालन :अंडी व मांस व्यवसाय
  • डेअरी प्रकल्प : अंडी उबवणी व इन्क्युबेटर युनिट
  • आधुनिक तंत्रज्ञान : चारा विकास आणि स्मार्ट कॉलर / सेन्सर
  • सबसिडी / अनुदान :
  • सर्वसाधारण प्रकल्प : ५०% अनुदान
  • अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) : ७५% अनुदान
  • थेट लाभ : अनुदान DBT द्वारे थेट बँक खात्यात (२ टप्प्यात जमा)

तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.